तीर्थक्षेत्र

आजोबांच्या म्हणजे अण्णांच्या मांडीत बसून शंभुराजे आजोबांनी सांगितलेली गोष्ट मन लावून ऐकत होते. शंभूराजे म्हणजे तीन-साडेतीन वर्षाचा छोटा शंभू! त्याचं खरं नाव शुभम् पण शंभूच म्हणायचे सगळे त्याला .
सकाळी आईचं सगळं काम आवरेपयर्तं शंभू आजोबांबरोबर खेळायचा .नंतर आजी त्याला जेवण भरवायची. तोवर त्याच्या आईचं अजून थोडं काम व्हायचं. शंभूराजे नंतर आपल्या आईच्या स्कूटीवर बसून बाहेर पडायचे. बाजारामध्ये चक्कर मारून भाजी, फळे, औषधे वगैरे कायकाय हवे ते घ्यायचे माय लेक. विनय  म्हणजे  शंभुचा बाबा क्वचितच भेटायचा त्याला. त्याची फिरतीची नोकरी होती. लांब लांब जावं लागायचं त्याला विमानाने. इकडे वाईमध्ये आई-बाबा एकटे ,तिकडे पुण्यामध्ये बायको मेधा आणि मुलगा एकटे, मग त्याला खूप काळजी वाटायची सगळ्यांची .म्हणून बायको मुलाला वाईतच ठेवलं होतं ,आई-वडिलां जवळ. मेधाचं माहेरही वाईतच होतं. त्यामुळे त्याला बिनधास्त कुठेही फिरता यायचं .महिन्यातले चार-पाच दिवस कसेतरी भारतात ,त्यातले एक दोन दिवस वाईत घालवायला मिळायचे त्याला. शंभूचा दिवस तर सगळा मजेत जायचा पण संध्याकाळी त्याची आई कावरीबावरी व्हायची ,आजी व्याकूळ व्हायची ,आजोबा येरझारा घालायचे. त्यावेळेला शंभूला अगदी रडू यायचं .मग शेवटी तो "बाबा" म्हणून जोराने रडायचा सुद्धा. खरं तर बाकीच्यांना सुद्धा रडायचं असायचं पण ते तिघेही शंभूची समजूत घालायला लागायचे. शेवटी एक दिवस अण्णांनी विनयला सांगितलं "विनय ,आता पुरे पैसा पैसा !तुझा मुलगा मोठा व्हायला लागलेला आहे. तुझ्यासाठी झुरतो आहे तो .सोड ही नोकरी .नको इतका वेळ काम करूस .दुसरी एखादी घरी राहून करता येईल अशी नोकरी बघ .मुलासाठी पुरेसा वेळ देता आला पाहिजे तुला. मेधा बोलत नाही काही पण तुम्हाला दोघांना सुद्धा किती कमी वेळ मिळतो एकमेकांसाठी .बघ बाबा दुसरी नोकरी!"
योगायोगाने विनयला दुबईला एक छान जॉबची ऑफर आली. फिरती नव्हती हे मुख्य . पहिला जॉब सोडून विनय काही दिवसांसाठी घरी आला .सगळ्यांना आनंद झाला. शंभूचा पासपोर्ट काढला .विजा, तिकिटे झाली. सामानाची बांधाबांध सुरू झाली. सगळ्या दुबईच्या गप्पा .आनंदात होते सगळे. आजोबांच्या मांडीत बसून शंभू हे सगळे बघत होता .मेधाची बॅगांमध्ये सामान ठेवण्याची लगबग सुरू होती.  त्याच्या डोक्यात एकदम काहीतरी विचार आला .मेधाजवळ येऊन तिला म्हणाला, "आई ही माझी बॅग ,यात सगळे माझे कपडे भरले आहेस ना तू ?ही तुझी बॅग, तिच्यामध्ये तुझे कपडे आहेत, ती बाबाची बॅग ,तिच्यामध्ये सगळे बाबाचे कपडे आहेत .आजोबांची बॅग कुठे आहे ?आणि आजीची बॅग कुठे आहे?" विनयने त्याला उचलून घेतले आणि समजावून सांगायला लागला "अरे आपण तिघे जाणार आहोत दुबईला. आजी आबा इथेच राहणार आहेत. हे घर सांभाळायला हवं ना. " हे ऐकल्याबरोबर शंभू विनयच्या खांद्यावरून भरकन खाली उतरला ,आजोबांजवळ गेला आणि त्यांच्या गळ्यात हात टाकून म्हणाला "आजोबा तुम्ही नाही येणार का? मग मीही नाही जाणार तुम्हाला सोडून कुठे.आईला जाऊदे बाबा बरोबर हवं तर". हे ऐकल्यावर आबांच्या डोळ्यात अश्रू धारा वाहू लागल्या .विनयला तर धक्काच बसला. मेधा आणि आजी सुद्धा लगबगीने बाहेर आल्या. शंभू आजोबांच्या मांडीत बसून त्यांच्या गळ्यात हात घालून त्यांचे डोळे पुसत होता ."रडू नका आबा ,मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही" .हे ऐकल्यावर विनयने जाहीर करून टाकले "मीही कुठे जाणार नाही आता तुम्हाला सोडून. तुम्ही मला शिकवलत मीही चांगल्या मार्गाने शिकत गेलो. मोठ्या पदाची नोकरी केली. पण आता तुम्हाला सोडून जावं असं मलाही वाटत नाही. आम्हा भावंडांवर तुम्ही जे संस्कार केलेत तेच संस्कार मला माझ्या मुलांवर करायचे आहेत ,जिथे तुम्ही आहात तिथेच माझी कर्मभूमी !अण्णा ,तुम्ही मला भिक्षुकी शिकवलेली आहे लहानपणी आणि शेतात ही जात होतो मी तुमच्या बरोबर! शेतीही विसरलेलो नाहीये मी. पैसा रगड कमावला आहे मी . आता मला माझ्या मुलासोबत ,कुटुंबासोबत आयुष्य जगायचं आहे, मी काहीही उद्योग करू शकतो आपल्या गावात.आपलं कुटुंब हेच तीर्थक्षेत्र आहे माझं."


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा