क्षमापना

आज पर्युषणाचा शेवटचा दिवस !
एकमेकांची मोकळया मनाने क्षमा मागायचा दिवस !
मागील आयुष्यात झालेल्या चुकांचा पश्चाताप करून एकमेकांची क्षमा मागायचा दिवस!

देवा ब्राह्मणांच्या साक्षीने माझा धरलेला हात तू आजवर नाही सोडलास.
नेकीने संसार करत राहिलास आणि पाय जमिनीवर ठेवून चाललास.
माझ्या पूर्व आयुष्यात तू कधीच नाही डोकावलास.
इतका कसा रे तू संयमाने राहिलास!
आज सांगते तुला,
प्रियकराने पाठ फिरवल्या नंतर मी होता रडून रडून केला बोभाटा .
त्याला खोटारडा ,बेईमान ठरवण्याचा मी केला आटापिटा.  त्याला परत मिळवण्याचा प्रयत्न कितीतरी वेळा केला. तुझ्याशी लग्न करतांनाही त्याने माझ्या मनाचा ताबा कधीच नाही सोडला.
तुझ्यामाझ्या मीलनावेळी तोच सोबत होता माझ्या,
जेंव्हा तू अनुभवत होतास स्त्रीचा स्पर्श पहिलावहिला,
तेव्हा हे काय लक्षात आलं नसेल का तुला?
पण तू नेकीने संसार करत राहिलास आणि पाय जमिनीवर ठेवून चाललास.
इतकी प्रेम करत होते मी त्याच्यावर पण त्याच्यासाठी आजन्म वाट पाहण्याचा संयम नाही जमला मला.
शरीराचे बंड नाही मोडता आलं तारुण्याला .
तुझ्या हातात हात देताना मी फक्त व्यवहार पाहिला. आईबापांच्या  डोक्यावरचं ओझं तुझ्या डोक्यावर ठेवून
आजवर पत्नीधर्म नेकीने निभावला .
पाच पतींच्या सहवासात राहून पत्नीधर्म तर द्रौपदीनेही होता निभावला .
पण एका बेसावध क्षणी, कर्णाला पाहताच ,द्रौपदीनेही तर कलिजा होता गमावला !
तू झिजलास माझ्याचसाठी फक्त अन मी गृहीत धरत गेले तुला. एकाच म्यानात दोन तलवारी घालायचे सहज जमून गेले मला.

तुझ्यातले अनेक दोष दिसायचे मला ,नुसते दिसायचे नाहीत तर सलायचे मनाला! (जशी काही मी अगदी निर्दोष आणि आदर्श होते.)
पुढे वर्षानुवर्षे तेच तेच .अति परिचयाने तुझा स्पर्शही होता नको-नको झालेला .
कंटाळले होते तेच ते ,तेच ते ,बेचव ,आळणी आयुष्य जगायला .
अशात 'तो' आयुष्यात आला!
चारचौघांसारखाच वाटला सुरुवातीला ,
पण नंतर काय झालं कळलंच नाही,
प्रौढ वयातही अक्कल गेली शेण खायला!
अन मीच लागले त्याचा पिच्छा पुरवायला .
जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तोच लागला दिसायला.
कसली नेकी! पाय सुटले जमिनीवरचे हवेत लागले उडायला!
मनाचे वारू लागले चौफेर उधळायला .
बुद्धीचा अंकुश नाहीच राहिला मनाला.
वेळ लागला नाहीच हेही तुझ्या लक्षात यायला .
पत्नीधर्म निभावत होते ना मी अंगी मुरलेला .
जागाही देत नव्हते मी तुला बोट ठेवायला.
पण माझ्यात झालेला बदल आलाच तुझ्या नजरेला .
माझ्या मनाची रस्सीखेच दिवसेंदिवस लागली ताणायला.
आपलं वय ,पद ,प्रतिष्ठा, नातलग, मैत्रिणी यांचं भान होतं मला.
प्रतारणा केली तुझ्याशी पण घट्ट सावरून धरले स्वतःला .
अशीच वर्ष गेली कितीतरी, वय लागलं उतरणीला .

कुठून आलं शहाणपण माहित नाही पण  मला तुझी दयाच लागली यायला.
आज अखेरच्या क्षणी मी आले आहे तुझी क्षमा मागायला.
नाही रे जमलं मला, या हलकट मनाला, पतिपरायण व्हायला. तुझी सच्चाई, तुझं साधेपण ,तुझी निष्ठा ,तुझे मौन ,तुझा बावळटपणा यांनी शेवटी हरवलं मला.
मी नाही तुझ्या लायकीची हे सांगायचे आहे मला.
आज तू खूप उंच जाऊन बसला आहेस आणि मी स्वतःच्या नजरेत पार खाली गडगडले आहे रे!
जे झालं ते असं झालं ,यात चूक कोणाची, बरोबर कोण हे कोणी ठरवायचं?
निसर्गशरण आपण माणसं! असं आपलं आपणच म्हणायचं. जे झाले त्यावर उपाय नाही पण वाईट वाटते फार आणि डोळे लागलेत गळायला.
अशी कशी अक्कल गेली शेण खायला!
कितीही वाईट झालं म्हटलं तरी त्या वाईटात लागतंच काहीतरी चांगलं जाणवायला .
सल घालवण्यासाठी मन लागलं भक्तिमार्गाला .
खूप विचार केला कां असेल असं झालं माझ्या मनाला?
काय असेल देवाच्या मनात मला शिकवायचं?
आणि सुदैवाने माझं मलाच उत्तर सापडलं.
एका मोठ्या संतांचे प्रवचन ऐकत असताना कळलं अनुसंधान कसं हवं ईश्वराचं ?
'जार प्रेम' जसं असतं जबरदस्त, तसं !
"जार प्रेम!"
मनाला आवरून धरता येत नाही,
उघड व्यक्त करता  येत नाही.
यार नजरेसमोरून हलत नाही.
प्रत्येक श्वास त्याच्यासाठी, त्याच्याच साठी.
रडणं हसणं त्याच्यासाठी ,त्याच्याच साठी.
जगणं-मरणं त्याच्यासाठी ,त्याच्याच साठी.
ह्याचं नाव प्रेम!
हयाचेच नाव पूजा!
ह्याचेच नाव समाधी!
शरीराचा होतो नैवेद्य!
आनंदाच्या लाटा लहरी उठतात शरीरात
आणि पाणी मात्र येतं डोळ्यात.
मनाच्या दोर्‍या दिल्या जातात त्याच्या हातात.
फायदा-तोटा हिशोब सारे संपून जातात .
अस्तित्वाचे सारे पुरावेच संपून जातात.
उरतो फक्त तो! तो आणि तोच सर्वत्र!
अरिहंत! अरिहंत! अरिहंत!!!
हेच तर मी अनुभवले जागृतीत,
व्यक्तींच्या बाबतीत!
आता हाच सोहळा भोगायचा सुषुप्तित,
ईश्वरीशक्तीच्या बाबतीत!
ठरलं आता निश्चित!
पतिपरमेश्वरा,ध्येयनिष्ठेबाबत आता तू माझा गुरू !
कारण तू नेकीने संसार करत राहिलास आणि पाय जमिनीवर ठेवून चाललास.









टिप्पण्या